Latest Marathi News Updates

राजनाथ सिंह: ‘पाकिस्तानात मिसाईल पडणे ही गंभीर बाब, चौकशीचे आदेश दिले,’ जाणून घ्या काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत पाकिस्तानच्या हद्दीत भारताकडून क्षेपणास्त्र डागल्याच्या घटनेबाबत वक्तव्य केले आहे. क्षेपणास्त्र चुकून पडले असून सरकारने हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ते म्हणाले की, क्षेपणास्त्र पडण्यामागचे कारण तपासानंतरच समजेल. पाकिस्तानने याप्रकरणी संयुक्त चौकशीची मागणी केली होती. मात्र भारताने ते आधीच फेटाळून लावले आहे.

राजनाथ सिंह सभागृहात म्हणाले, ‘ही घटना ९ मार्चची आहे. क्षेपणास्त्र युनिटची नियमित देखभाल आणि तपासणी दरम्यान, संध्याकाळी 7 च्या सुमारास एक क्षेपणास्त्र चुकून फायर झाले आणि ते पाकिस्तनच्या हद्दीत जाऊन कोसळले. या घटनेचे नेमके कारण तपासानंतरच समजेल. मी हे देखील सांगू इच्छितो की या घटनेच्या संदर्भात ऑपरेशन, देखभाल आणि तपासणीसाठी मानक कार्यपद्धतींचा देखील आढावा घेतला जात आहे.’

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ‘आम्ही आमच्या शस्त्रास्त्र यंत्रणेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतो. या संदर्भात काही कमतरता आढळून आल्यास ती त्वरित दुरुस्त करण्यात येईल. आमची क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित आहे, याची मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो. आमची सुरक्षा प्रक्रिया आणि प्रोटोकॉल सर्वोच्च दर्जाचे आहेत.”

भारताने 9 मार्च रोजी नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे चुकून क्षेपणास्त्र डागल्याचे सांगितले होते. त्यामुळे भारताकडून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. निशस्त्र क्षेपणास्त्राने त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे पाकिस्तानने म्हटले होते.

Leave a Reply