Latest Marathi News Updates

मोठी बातमी: महाराष्ट्रातून सर्व कोरोना निर्बंध हटवले जातील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा निर्णय

मोठी बातमी: महाराष्ट्रातून सर्व कोरोना निर्बंध हटवले जातील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा निर्णय

मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आता कोरोनाचे संक्रमण जवळपास पूर्णपणे नियंत्रणात आले आहे. आता राज्यात दररोज कोरोनाचे मोजकेच रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, राज्यातील अर्थव्यवस्था झपाट्याने सावरत आहे.  २ मार्चपासून मुंबई महानगरपालिकेने शाळांना परिपत्रकही जारी केले आहे की, त्यांना त्यांच्या संस्था कोरोनाच्या कालावधीपूर्वी सारखे पूर्ण क्षमतेने चालवता येतील.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जे कोरोनाचे निर्बंध आहेत, आता ते कायम ठेवण्याची गरज नाही. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोना प्रतिबंध उठवण्याचा निर्णय  घेतला आहे.

शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर येत्या तीन-चार दिवसांत राज्यातून सर्व निर्बंध हटवले जातील. मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोना संबंधित परिस्थितीचा तपशील सादर केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना निर्बंध उठवल्यानंतर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समित्यांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंध हटवण्याबाबतच्या आदेशात बदल करण्याचे अधिकार असतील. म्हणजेच, कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंजूरीबाबत निर्णय बदलण्याचे अधिकार जिल्हा समित्यांना असतील.

सध्याच्या नियमांनुसार हॉटेल्स-रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, जिम, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत. आता ही बंदी सरसकट उठवली जाण्याची शक्यता आहे. लग्नाला जास्तीत जास्त 200 लोक उपस्थित राहण्याच्या अटी देखील शिथिल केल्या जाऊ शकतात किंवा नियम पूर्णपणे रद्द केला जाऊ शकतो.

Leave a Reply